धैर्यशील माने-राहुल आवाडे यांच्या वाहनचालकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी…..

इचलकरंजी येथे पूर परिस्थिती पाहण्यासाठी आलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दौर्‍यादरम्यान गाडी पुढे-मागे घेण्यावरुन खासदार धैर्यशील माने आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या वाहनचालकांची फ्री स्टाईल हाणामारी झाली.या घटनेची दिवसभर चर्चा रंगली होती.शहरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शनिवारी पालकमंत्री मुश्रीफ हे इचलकरंजीत आले होते. नदीतीरावरुन पाहणी करुन ते संपूर्ण लवाजम्यासह नाट्यगृह येथील पूरग्रस्तांच्या छावणीत आले. या ताफ्यात खासदार धैर्यशील माने व राहुल आवाडे यांच्याही गाड्या होत्या. नाट्यगृहात वाहन पार्किंग करत असताना वाहन पुढे मागे घेत असताना दोन्ही वाहने एकमेकाला घासली. त्यावरुन माने यांचा चालक योगेश पाटील व आवाडे यांचा चालक मनोज लाखे यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. शिव्यांची लाखोली वाहत या वादाचे पर्यावसान बेल्टने हाणामारी करण्यात झाले.

त्यातून एकमेकांच्या अंगावर धावून जात कपडेही फाडण्यात आले. त्याठिकाणी असलेल्या अन्य वाहनांच्या चालकांनी दोघांनाही बाजूला करत मारामारी सोडविली. मात्र या हाणामारीची दिवसभर शहरात चांगलीच चर्चा रंगली होते. इचलकरंजीत पूर परिस्थिती धोका पातळी ओलांडत असताना किरकोळ कारणावरून नेत्यांच्या वाहन चालकात पूरग्रस्त छावणीच्या ठिकाणी असा प्रकार घडल्याने घटनेचे गांभीर्य नसल्याची भावना व्यक्त होत आहे.