गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात सगळीकडे पावसाने धुमाकूळ घातला असताना खानापूर घाटमाथ्यावर मात्र पावसाची रिमझिम सुरू होती. या पावसामुळे खानापूर तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली नव्हती, त्यामुळे पुरामुळे कृष्णेचे वाहून वाया जाणारे पाणी टेंभू योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागाकडे वळवावे, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे या तलावात टेंभूचे पाणी सोडले आहे. खानापूर तलावात टेंभूचे पाणी सोडल्याने तलाव शंभर टक्के भरला आहे. तलावाच्या सांडव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे खानापूरचा ओढाही भरून वाहत आहे. या पाण्याने तलाव तुडुंब भरून वाहू लागला आहे.
खानापूर शहराला पाणीपुरवठा करणारी विहीर या तलावातील पाणी साठ्यावर अवलंबून असल्याने खानापूरचा पाणी प्रश्न निकालात निघाला आहे. या पाणी साठ्यामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ होऊ लागली आहे. तलाव भरून वाहू लागल्याने खानापूरच्या ओढ्यातील बंधारेही ओसंडून वाहू लागले आहेत, त्यामुळे परिसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.