केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 16 पासून राज्याच्या दौऱ्यावर…

विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १६ ते १८ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली.शहा हे तीन दिवसांच्या महाराष्ट्र भेटीदरम्यान राज्यातील सर्व सहा विभागांचा दौरा करून विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार असल्याचे समजते. त्या त्या विभागातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीला आता दोन महिन्यांपेक्षाही कमी कालावधी उरला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भ आणि मराठवाड्यात भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या दोन भागातील कामगिरी सुधारण्याचे तगडे आव्हान पक्षासमोर आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावर महायुतीला तोडगा काढावा लागणार आहे.

या विषयावरही शहा पक्षाच्या नेत्यांशी सल्लामसलत करण्याची शक्यता आहे.

महायुतीचा पहिला मेळावा कोल्हापुरात

महाराष्ट्र सरकारने हाती घेतलेल्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी महायुती एकत्रित मेळावे आयोजित करणार आहे. यातील पहिला संयुक्त मेळावा कोल्हापूर येथे २० ऑगस्ट रोजी होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या बैठकीत यासंदर्भात तिन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांची चर्चा झाली. कोल्हापुरातल्या पहिल्या मेळाव्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.