निक्कीची जिरवायला बिग बॉस राखीला आणा! नेटकऱ्यांची मागणी

बिग बॉस मराठी’ चा तिसरा आठवडा सुरू झाला असून बहुतांशी सगळेच स्पर्धक आता आपला खेळ खेळू लागले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्याच दिवसापासून आरडाओरड आणि आक्रमक भूमिकेने निक्की तांबोळीने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. निक्की तांबोळीने बोलण्याच्या ओघात, चढ्या आवाजात बोलताना वर्षा उसगावंकर (Varsha Usgaonkar) यांच्यासह घरातील इतर सदस्यांनादेखील उलटसुलट बोल लावले होते. ‘भाऊचा धक्का’मध्येही रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) निक्कीला यावरून चांगलेच झापले आहे. मात्र, निक्कीच्या वागण्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे निक्कीला अद्दल घडवण्यासाठी नेटकऱ्यांनी थेट राखी सावंतला घरात प्रवेश देण्याची मागणी केली आहे. 

राखी सावंत आणि निक्की तांबोळी यांनी हिंदी बिग बॉसमधील 14 व्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता.  ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदाच्या सीझनमध्ये सहभागी झालेली निक्की तांबोळी ही इतर सदस्यांना जुमानत नाही. त्याशिवाय, तिला जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल आणि वैभव चव्हाणची साथ आहे. घरातील इतर सदस्यांना उलटसुलट बोलणं, भांडण उकरून काढण्याचे प्रकार होत असल्याने प्रेक्षकांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. 

निक्कीच्या या दादागिरीला वैतागून आता प्रेक्षकांनी राखी सावंतला वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्याची मागणी केली आहे. बिग बॉस 14 मध्ये राखी सावंतने निक्की तांबोळीला जसास तसे उत्तर दिले होते. या दोघींमधील वादात अनेकदा निक्कीने राखीसमोर माघार घेतली. बिग बॉसच्या घरातील निक्की आणि राखी यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत राखी निक्कीला सुनावताना दिसत आहे. 

सोशल मीडियावर निक्की आणि राखीच्या वादाचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या कमेंट्स सेक्शनमध्ये युजर्सकडून निक्कीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. एका युजरने म्हटले की, राखी सावंत ला मराठी बिग बॉस मध्ये पाठवलं पाहिजे. या युजरच्या म्हणण्याला इतरांनी दुजोरा दिला. एकाने म्हटले की, या निक्कीचा सगळा माज उतरवून ठेवेल असे म्हटले. राखी सावंत ला पुन्हा एकदा मराठी बिग बॉस मध्ये संधी मिळाली पाहिजे ही बिग बॉसला विनंती आहे, असे एका युजरने म्हटले. व्हिडीओ पाहून एका युजरने म्हटले की बाईईईई…राखीला घाबरते असे एकाने म्हटले.