इस्लामपूर येथील नेहरूनगर परिसरात चोरट्यानी धुमाकूळ घातला. तेथील सलग चार घरे फोडून सोन्याचे दागिने, १ लाख रुपयांची रोकड असा २ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत याची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली नव्हती.
शहरात सलग सुरू असलेल्या घरफोडीच्या सत्राने नागरिकांच्यात घबराट आहे.शिवानंद बसवराज विभूते, मारुती शिवलिंग विभूते, विठ्ठल शंकर विभूते, बसवराज शिवलिंग विभूते हे व्यावसायिक असून नेहरूनगर परिसरात शेजारी शेजारी राहायला आहेत. त्यांच्या नातेवाईकांचा कार्यक्रम असल्याने ते सर्व दोन-तीन दिवसांपूर्वीबाहेरगावी गेले होते.
मंगळवारी शिवानंद यांना शेजाऱ्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. शिवानंद यांनी इस्लापुरात येऊन पाहिले असता दरवाजाचे कुलूप फोडले होते. कपाटातील मंगळसूत्र, सोन्याची चेन असा दीड तोळ्यांचा ऐवज २५ हजार रुपयांची रोकड लांबवली. त्यांच्या शेजारी तीन ठिकाणी घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले.
मारुती यांच्या घरातील १५ हजार रुपये, विठ्ठल यांच्या घरातील ४० हजार रुपये, बसवराज यांच्या घरातील २५ हजार रुपये चोरट्यानी लांबवले. चोरट्यानी शेजारच्या घरांना कड्या घातल्या होत्या. शिवानंद यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे.