दिवंगत विलासराव शिंदे व आमचे घरगुती नाते होते. आम्ही त्यांच्यासमवेत काम करायचो. मात्र शिंदे यांच्या निधनानंतर आष्ट्यासंदर्भात चिंता लागून होती. आष्ट्याचा विकास रखडण्यामागचे कारण सन १९७८ चा पराभव आहे.एका दिग्गज नेत्याचा आष्टा शहराने पराभव करून विलासराव शिंदे यांना आमदार केले. त्याचा राग काहींच्या मनात असू शकतो. त्यामुळे आष्ट्याचा विकास जेवढा व्हायला पाहिजे होता, तेवढा झाला नाही, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी येथे केले.
लवंगेश्वर मंदिर विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले, ३५ वर्षांच्या काळात अनेक विकासकामे व्हायला पाहिजे होती. जर पेठ-सांगली महामार्गाचे काम २० वर्षांपूर्वी झाले असते, तर आष्टा शहराचा कोल्हापूर, सांगली, कऱ्हाड, पलूस, विटा या शहरांशी संपर्क वाढला असता. व्यापारात वाढ झाली असती. महापुरापासून धोका नसल्यामुळे आष्टा व इस्लामपूर ही शहरे सुरक्षित मानली जाऊ लागली आहेत.
कोल्हापूर येथे आयटी पार्क होणार आहे. कोल्हापूरपासून जवळ असणारे शहर म्हणून आष्ट्याला नक्कीच लाभ होईल. २४ × ७ पाणी योजना, भुयारी गटार, रिंग रोड या सुविधा आष्टा शहरात झाल्या, तर आष्टा हे शहर जिल्ह्यातील सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर बनेल.’