चौदा तोळे दागिने चोरणाऱ्या महिलेस इचलकरंजीतून अटक

मध्यवर्ती बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या पर्समधील दागिने चोरणाऱ्या महिलेस आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने इचलकरंजीतून अटक केली.या महिलेकडून १४० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

सुशीला विष्णू चौगुले (रा. उंबरवाडी, महागाव, ता. गडहिंग्लज) या २७ एप्रिल २०२४ च्या सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास गडहिंग्लजला जाण्यासाठी एसटी बसमध्ये चढत होत्या.

यादरम्यान त्यांच्या खांद्यास अडकविलेल्या पर्सची चेन काढून कोणीतरी १४० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले. याबाबतची चौगुले यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर राहिला. त्यानुसार तांत्रिकदृष्ट्या व गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित महिला आरोपीपर्यंत तपास पोहचला.

त्यानंतर बुधवारी (ता. १४) उपलब्ध पत्त्यावर तिचा शोध घेऊन तिला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार सात लाख २५ हजार १६० रुपये किमतीचे १४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तिच्याकडून जप्त केले.