पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीत (स्व.) आमदार भारत भालके यांच्या पत्नी उमेदवार असत्या तर आपण निवडणूक लढविणार नव्हतो, असा गौप्यस्फोट पोटनिवडणुकीत विजय झालेले भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान आवताडे यांनी केला. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात कासेगाव येथे औद्योगिक वसाहत मंजूर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी हा खुलासा केला आहे.
ते म्हणाले की, राज्य सरकारकडून पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 2019 मध्ये अर्थसाहाय्य मिळत नव्हते, त्यामुळे (स्व.) आमदार भारत भालके हे निवडणूक लढविण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
त्यावेळी त्यांनी मी उमेदवारी अर्जावर सही करत असताना मला तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात त्यांना अर्थसाह्य उपलब्ध झाले, त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती.पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीत भारत भालके यांच्या पत्नीची उमेदवारी असती, तर आपण निवडणूक लढवणार नव्हतो.
मात्र, पक्षीय स्तरावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे निवडणूक लढवावी लागली. मात्र, कमी काळात जास्तीचा निधी उपलब्ध करण्यात आपण यशस्वी ठरलो, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला.
दरम्यान, पंढरपूर औद्योगिक वसाहतीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला. कासेगाव येथील औद्योगिक वसाहतीच्या मंजुरीची अधिसूचना निघाल्यानंतर पंढरपुरातील विरोधकांनीसुद्धा फोन करून माझे अभिनंदन केले, असेही आमदार आवताडे यांनी सांगितले.
आवताडे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर परिसरात औद्योगिक वसाहत व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, त्या प्रयत्नाला यश येत नव्हते. पोटनिवडणुकीत या भागातील मतदारांनी मला संधी दिली. त्यानंतर एमआयडीसीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
