हुपरी येथील नगरपरिषद प्रशासनाने कोणाच्याही दबावाची भीड न बाळगता वस्तुस्थितीचा अहवाल शासनाला पाठवून पाणीपुरवठा योजनेचे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणी शिवसेना व युवा सेनेने केली. हुपरी शहरासाठी मंजूर झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांतून मलिदा लाटण्याच्या हेतूने निरर्थक मुद्दयाचे कागदी घोडे नाचवत माजी लोकप्रतिनिधी व काही लोकांकडून योजनेला ‘खो’ घालण्याचा डाव खेळला जात आहे.
राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली.निवेदनात म्हटले आहे, शहराची पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून महायुती सरकारच्या माध्यमातून नगरोत्थान महाभियानांतर्गत ४६ कोटी ५० लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे नवीन वसाहती, मळेभाग तसेच विस्तारलेल्या भागांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येणार आहे.