साजणी येथील नवमहाराष्ट्र सूतगिरणी येथे चेतन बाग (वय २८) आणि संजयकुमार मलिक हे दोघे मजुरीचे काम करत असल्याने शेजारी राहत होते. चेतन बाग यांचा मुलगा जतिन (वय ३) याचा संजयकुमारला लळा लागला होता. रविवारी सकाळी ८ वाजता संजयकुमारने जतिनला चॉकलेटचे आमिष दाखवून घराबाहेर घेऊन गेला. काहीवेळाने लहान मुलगा आणि आपला शेजारी घरी आले नसल्याने चेतन बाग यांनी परिसरात शोधाशोध केली.
दुपारी हातकणंगले पोलिस ठाण्यात लहान मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. हातकणंगले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी गुन्हा दाखल करून तत्काळ यंत्रणा कामाला लावली. दोन पथके तयार करून शोध सुरू केला. संशयित आरोपी संजयकुमार सोलापूर परिसरात असल्याचे त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून स्पष्ट झाले. सोलापूर एलसीबीने तत्काळ रविवारी सायंकाळी ७ वाजता संजय कुमार आणि जतिन यांना सोलापूर रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले.