दहशत माजविण्यासाठी आलेल्या ड्रोनचा युवकांनी सुरू केला गनिमी काव्याने थरारक पाठलाग

अवकाशात फिरणारे अज्ञात ड्रोन ते ड्रोन उचापत खोरांचेच असल्याची खात्री पटल्याने चोरट्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली असताना त्या दहशतीस पुरून उरेल इतका गरम रक्ताच्या तरुणाईचा उत्साह आणि त्या उत्साहाच्या भरात वाळवा तालुक्यांच्या पूर्वेत्तर भागातील तरुणांनी ड्रोनचा केलेल्या थरारक पाठलागाने शनिवारची रात्र परिसरातील शिरटे, येडेमच्छिंद्र, बेरडमाची, किल्लेमच्छिंद्रगड, नरसिंहपुर, कोळे, बीचुद, भवानीनगर गावातील नागरिकांनी जागून काढली.

तरुणांनी इस्लामपूर पोलिस स्टेशनकडे चौकशी केली असता ते ड्रोन प्रशासनाचे नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर तरुणाई एकवटली. काही झाले तरी आज एक तरी ड्रोन पाडायचाच या इर्षेने तरुणाई पेटून उठली. तरुणांनी एकत्रीत येत एखाद्या ॲक्शन चित्रपटास शोभेल अशा पद्धतीने चक्रव्युह आखला.चारी दिशांना गनिमी काव्याचा वापर करीत ड्रोनचा पाठलाग सुरु केला.

सुमारे ५० ते ६० युवकांनी जीवाचे रान करीत गड खिंडीपर्यंत दमछाक होईपर्यंत पाठलाग केला. पण दुर्दैवाने ड्रोन टिपण्यात त्यांना यश आले नाही. अशाच प्रकारचा प्रयत्न बेरडमाची येथेही करण्यात आला.’एकीकडे प्रशासनाकडून ड्रोन शासनाचे नाहीत हे स्पष्ट केले जात आहे मग रात्रीचे ड्रोन कोण उडवतोय. याचा शोध पोलिसांनी तातडीनं घ्यावा अशी मागणी केली जात आहे.