आटपाडी संपूर्ण महाराष्ट्रसह, कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असणारी आटपाडीची उत्तरेश्वर देवाची यात्रा गुरुवार दि. १४ नोव्हेंबरपासून सुरू होत असून शेळ्या-मेंढ्याची यात्रा यंदा बाजार समितीच्या आवारामध्ये भरणार असल्याची माहिती सभापती संतोष पुजारी यांनी दिली. यात्रेमध्ये शेळ्या-मेंढ्याची व माणदेशी खिलार जनावरांची यात्रा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात तीन दिवस भरणार आहे.
गतवर्षी शेळ्या-मेंढ्याची यात्रा ही ओढापात्रात भरवली होती. मात्र याठिकाणी सुरक्षितता व शेतकरी यांना सोईसुविधा मिळत नसल्याने बाजार समितीच्या आवारात भरवण्यात येणार आहे. श्री उत्तरेश्वर उत्सवानिमित्त यात्रा आटपाडी येथे शेळ्या मेंढ्या व खिलार जनावरांची यात्रा १४ ते २० नोव्हेंबर रोजी सरू होत आहे.
यात्रेमध्ये शेल्या मेंढ्या, गाई, म्हशी, रेडे, घोडे खरेदीकरिता बेंळगाव, सोलापूर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून व दुधेभावी ढालगांव येथून मोठ्या प्रमाणात व्यापारी व शेतकरी खरेदी विक्रीसाठी येणार आहेत. १४ ते १५ नोव्हेंबर रोजी शेळ्या मेंढ्या विक्री यात्रा, दि. १६ नोव्हेंबरपासून खिला जनावरांची यात्रा, २१ रोजी नैवेद्य कार्यक्रम होईल व रथाची मिरवणूक निघणार आहे.