सांगोला तालुक्यात सर्वपक्षीय नेत्यांकडून चाचपणी

 सांगोला तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची घोषणा होताच तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गावपातळीवरील नेते मंडळींनी निवडणुकीच्या हालचाली सुरू केल्या असून जनतेतून थेट सरपंच निवड होणार असल्यामुळे आपल्याच विचारसरणीचा व पक्षाचा उमेदवार सरपंच पदावर विराजमान करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून चाचपणी सुरू झाली आहे.

तसेच दुसऱ्या बाजूला सांगोला नगरपालिकेच्या ११ प्रभागांमध्ये निवडणुकीसाठी अनेक इच्छुक तयारीला लागले असून गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. प्रभाग क्रमांक १ ते १० मध्ये प्रत्येकी दोन उमेदवार तर ११ व्या प्रभागामध्ये तीन उमेदवार असतील. नगराध्यक्ष पदासाठी एक उमेदवार असणार असून सांगोला नगरपालिकेसाठी एकूण २४ जागांसाठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे. मात्र स्व. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेकाप आ. डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकीत स्वबळावर नशीब आजमावतात की इतर पक्षांबरोबर आघाडी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना यांच्यासोबत शेकापची युती होण्याची शक्यता आहे. 

दुसरीकडे माजी आमदार शहाजीबापू पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांची महायुती निश्चित मानली जात आहे. माजी आ. दीपक (आबा) साळुंखे-पाटील यांचाही सांगोला तालक्यातील मोठा राजकीय प्रभाव गट आहे.यासोबत काँग्रेसची भूमिका अद्यापही स्पष्ट नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत आरपीआय, रा.स.प वंचित बहुजन आघाडी यांच्यासह तालुक्यात व शहरात दिव्यांग मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने प्रहार संघटनेची पण भूमिका महत्त्वाची असणार आहे. 

सांगोला नगरपरिषद व महूद बुद्रुक, जवळा, घेरडी, कोळा या राजकीय दृष्टीने महत्वाचे सत्ता केंद्र यांच्या निवडणुका लक्षवेधी असणार आहेत. सांगोला तालुक्यातील ५० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतींवर शेकापचे वर्चस्व कायम आहे. विशेष म्हणजे काही गावांमध्ये शेकापचेच दोन गट असल्यामुळे ‘शेकाप विरुद्ध शेकाप’ अशी लढत पाहायला मिळते. त्यामुळे निवडणूक कोणत्याही गटाच्या विजयासह संपली तरी सत्ता शेकापच्याच हातात राहते. इच्छुक उमेदवार आपल्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरे, सामाजिक उपक्रम, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे आयोजित करून जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत..