लेझरमुळे तरूणाच्या डोळ्याचा घात, लेझर लाईटमुळे डोळ्यात रक्तस्त्राव

संपूर्ण राज्यभरात गणपती बाप्पाचं वाजत-गाजत मिरवणूक काढत आगमन झालंय. कुठे लेझीम-ढोल-ताशांचा गजर असा मराठमोळा थाट होता. तर कुठे विद्युत रोषणाई, डीजे, लेझरचा मारा होता. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील उचगावमध्ये याच लेझरमुळे तरुणाच्या डोळ्यावर विघ्न आलंय.

21 वर्षीय आदित्य बोडके हा देखील मिरवणूक पाहण्यासाठी गेला होता. या मिरवणुकीत प्रखर लेझर किरणांचा वापरण्यात आला होता. मात्र ही किरणं डोळ्यावर पडल्यानं या तरुणाचा डोळा लाल होऊन पाणी वाहू लागलं. त्याला शास्त्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्याच्या बुबुळाला या किरणांमुळे इजा झाली होती. डोळ्यामध्ये रक्तस्त्राव झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले.या लेझरचा उचगाव परिसरात अनेकांना त्रास झाल्याची चर्चा आहे. टेंबलाईवाडीत बंदोबस्ताला असणारे हवालदार युवराज पाटील यांच्याही डोळ्याला लेझरमुळे त्रास झाला. त्यांचा उजवा डोळा लाल होऊन सूज आल्याने त्यांनीही उपचार घेतल्याची माहिती आहे.