ठाण्यातल्या मुंब्य्रातील शिवसेनेच्या शाखेचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मुंब्रातील शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोजर फिरवल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज उद्धव ठाकरे भेट मुंब्य्रातील शाखेला भेट देणार असून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी संजय राऊतही उपस्थित असतील.
दरम्यान उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शिवाय दौऱ्यावर ड्रोनद्वारे पोलिस नजर ठेवणार आहेत. दुसरीकडे शाखा परिसरात 100 मीटरपर्यंत नेते आणि कार्यकर्त्यांना प्रवेशबंदी आहे. शिवाय दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्यात. शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन किणे यांनी बुलडोजर फिरवलेल्या शाखेला उद्धव ठाकरे हे स्वतः सायंकाळी भेट देणार आहेत.
मुंब्र्यात शिवसेना शिंदे गटाने जमीनदोस्त केलेल्या शाखेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे भेट देणार असून ते ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्या ठिकाणी पोलिसांनी बजावलेली 144 ची नोटीस मागे घेण्यात आली असून त्यामुळे उद्धव ठाकरे यांना या ठिकाणी भेट देण्यास अडवण्यात येणार नाही.