कुरळप सोसायटीच्या सभेत राडा! कार्यकर्ते आक्रमक

वाळवा तालुक्यातील कुरळप येथील सर्व सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा विठाई माऊली मठाच्या सभागृहात आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष इकबाल जमादार होते. अहवाल वाचन सचिव केरू मिसाळकर यांनी केले.

मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन सुरू असताना त्यामध्ये ऐनवेळी खर्चावर झालेल्या चर्चेला बगल दिल्याचे लक्षात येताच विरोधी गटाचे उत्तम वायदंडे यांनी आक्षेप घेतला, तर गतवर्षीच्या सभेचे प्रोसिडिंग संस्थेकडे वारंवार मागूनही ते दिले नाही, असा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी केला. त्यांनी पदाधिकार्‍यांना धारेवर धरत, संस्था सभासदांच्या मालकीची असल्याचे ठणकावले.

यावेळी संचालक उमेश पाटील यांनी अशोक पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तेथूनच वादाला सुरुवात झाली. यामध्ये उमेश पाटील व अशोक पाटील समोरासमोर येताच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला.