काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते तथा खासदार राहुल गांधी येत्या शुक्रवारी ४ व शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत.खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापूरमधील कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार असून शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी दिली.
खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा होणार आहे.
५ ऑक्टोबर रोजी खासदार राहुल गांधी हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहतील, अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.