संपूर्ण राज्यभरात लोणारी समाज हा विस्तारलेला आहे आणि लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे अशी या समाजाची अनेक वर्षाची मागणी होती आणि या मागणीस मा. आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच अन्य नेते मंडळींकडे वारंवार पाठपुरावा केलेला होता.
समाज व्यवस्थेत अत्यंत गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या लोणारी समाजाच्या तरुणांना राज्य सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून उद्योग व्यवसाय तसेच अन्य क्षेत्रामध्ये मदतीचा हात दिल्यास या समाजातील तरुण हे स्वतःच्या पायावर उभे राहून लोणारी समाजाच्या नावलौकिकात भर पाडतील अशी आग्रही मागणी दीपक आबा साळुंखे पाटील यांनी सरकारकडे केलेली होती.
लोणारी समाजाचे राज्यातील एकमेव आमदार म्हणून बहुमान मिळालेल्या आमदार रवींद्र धंगेकर यांचा सांगोला येथे भव्य नागरी सत्कार आयोजित करून या सत्कार समारंभातून सर्वात प्रथम ही मागणी दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्य सरकारकडे केलेली होती आणि अखेरीस राज्य सरकारने लोणारी समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सांगोला तालुक्यासह संपूर्ण राज्यभर पसरलेल्या लोणारी समाजाच्या जिव्हाळ्याच्या या विषयावर शिक्कामोर्तब करून मंजुरी दिल्याने लोणारी समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या निर्णयाबद्दल दीपकआबा साळुंखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष आभार मानलेले आहेत.