खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात मा. आम. राजेंद्रअण्णा देशमुख यांचा इशारा!

आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम कधीही वाजू शकतात. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात नेते मंडळींची लगबग सुरू झालेली आहे. तसेच अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारीवरून मतभेद देखील दिसून येत आहेत.

अशातच खानापूर आटपाडी मतदारसंघात माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश केलेला आहे. यामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघात महायुतीत एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर त्या काळात माझी उमेदवारी थांबवून मी दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली होती.

पाच टर्म झाले आटपाडीवर न्याय झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या भेटी वेळी आम्ही उमेदवारी मागितली असून यावेळी मैदान मीच मारणार असा खळबळ जनक सवाल माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी केला आहे. तुतारी आटपाडीकरांच्या हाती लागणार आहे याबाबत निर्णय शरद पवार हे काही दिवसांत देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महायुतीच्या स्थानिक नेत्यांशी आमचा कोणताही भेद नाही. वरिष्ठांचे विचार कमी पडत आहेत. आमच्या कार्यकर्त्यांच्या निर्णयावर आम्ही राष्ट्रवादी शरद पवार यांच्या विचाराने काम करणार आहोत. कार्यकर्त्यांचा देखील आग्रह होता त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीत आलो आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघात यंदाचे विधानसभा मैदान मीच मारणार असा इशारा इतर पक्षातील उमेदवारांना माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी दिलेला आहे.