कुंभोजच्या हिवरखान बिरदेव मंदिरास ब वर्ग दर्जा! समस्त धनगर बांधवांमध्ये आनंदोत्सव……

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज पंचक्रोशीत हिवरखान बिरदेव मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. प्रत्येक अमावस्येला हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. परंतु या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा नसल्यामुळे कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या यासाठी सागर पुजारी यांनी पुढाकार घेत या मंदिराला तीर्थस्थळाचा ब वर्ग दर्जा मिळाल्यास किमान तीन ते चार कोटी रुपये विकास कामांसाठी मिळतील म्हणून मंत्रालयात पाठपुरावा केला. तत्कालीन पर्यटन मंत्री आदिती तटकरे यांना वर्षाभरापूर्वी निवेदन देऊन मागणी केली. त्यांनी तात्काळ कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांना सविस्तर प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले होते.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कृती आराखडा तयार करून महिनाभरापूर्वी राज्य शासनाला सादर केल्यानंतर गतीने हालचाली सुरू झाल्या आणि हिवरखान बिरदेव मंदिर ब वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्यावर शिक्कामोर्तब झाले. अनेक वर्षांपासून प्रतिशत असलेल्या कुंभोज येथील हिवरखान बिरदेव मंदिराचे भाग्य उजळले आहे. या मंदिराचा ब वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये समावेश करण्याचे आदेश राज्य शासनाने काढलेले आहेत. आदेश प्राप्त झाल्यानंतर समस्त धनगर बांधवांनी साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.