राज्यात यावर्षी आपल्याला 6 दसरा मेळावे मिळणार  पाहायला

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. यावर्षी राज्यात आपल्याला 6 दसरा मेळावे पाहायला मिळणार आहेत. यापूर्वी, राज्यात कोल्हापूरमध्ये शाही दसरा सोहळा, नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा, यानंतर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनेचा राजकीय दसरा मेळावा सुरू केला.

यंदाही दसऱ्याच्या दिवशी 6 ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे. आता या मेळाव्यातून कोण काय बोलणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. आता हे मेळावे कधी आणि कुठे पार पडणार हे जाणून घेऊया…

कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा
कोल्हापुरातील शाही दसरा मेळाव्याची महाराष्ट्रभर चर्चा असते. राजगादीचा मान असल्याने या सोहळ्याला पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाते. छत्रपती शाहू महाराज आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यासह शाहू महाराजांच्या कुटुंबीयांकडून हा दसरा मेळावा साजरा केला जातो. यंदाही दसऱ्यादिवशी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास हा दसरा सोहळा साजरा होणार आहे.

नागपूरमधील संघाचा दसरा मेळावा
नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा यंदाही परंपरेनुसार होणार आहे. 12 ऑक्टोबर रोजी दसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजताच्या सुमारास येथे दसरा मेळावा साजरा केला जाणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा
शिवसेना उबाठा गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षी ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा दसरा मेळावा
शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा मुंबईच्या आझाद मैदानात होणार आहे. त्यासाठी आझाद मैदानात सध्या भव्य असे व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू आहे.विधानसभा निवडणूक असल्यामुळे शिवसेनेकडून यंदा भव्य शक्ती प्रदर्शन दसरा मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास मेळाव्याला सुरुवात होणार आहे.

पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा
मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुडे तब्बल 12 वर्षांनंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यात एकत्र येणार आहेत. पार्थर्डी तालुक्यातील भगवान गडावर पंकजा मुंडे व धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत हा दसरा मेळावा होणार आहे. दुपारी 1 ते 2 वाजताच्या सुमारास हा दसरा मेळावा होणार आहे.

मनोज जरांगेंचा दसरा मेळावा
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच मराठ्यांचा दसरा मेळावा होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. बीड जवळील नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा होणार आहे. मनोज जरांगेंचा दसरा मेळावा दुपारी 1 वाजताच्या सुमारास होणार आहे.