शिवस्वराज यात्रा 15 तारखेला यात्रा इचलकरंजीमध्ये……

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आजपासून (14 ऑक्टोबर) बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत आहे. यात्रेचा आजपासून हा शेवटचा टप्पा असेल. या यात्रेची सांगता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर या मतदारसंघांमध्ये होणार आहे. सांगता सभेला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, येत्या आठवड्यामध्ये विधानसभेसाठी बिगुल फुंकले जाण्याची शक्यता आहे. पक्षाची शिवस्वराज्य यात्रा 14, 15 आणि 16 तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल.

14 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आमदार रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांचा पक्षप्रवेश फलटणमध्ये होणार आहे. यात्रेतच हा पक्षप्रवेश होईल. या पक्षप्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा उपस्थित असणार आहेत. 15 तारखेला यात्रा इचलकरंजीमध्ये पोहोचेल. कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी आणि कागलमध्ये अशा दोन मतदारसंघांमध्ये ही शिवस्वराज यात्रा जाणार आहे.