जनसुराज्यकडून ‘या’ नेत्याला पुन्हा उमेदवारी; आमदार कोरेंची घोषणा

गेल्या विधानसभेला हातकणंगलेतून नवखे असतानाही अशोकराव माने यांचा निसटता पराभव झाला.मात्र, त्यांनी पाच वर्षांत मतदारसंघात संपर्कासह विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे यंदा जनसुराज्य शक्तीचे उमेदवार अशोकराव मानेच आहेत असे प्रतिपादन जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी येथे केले. येथे हातकणंगले तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्‍यात ते बोलत होते.

आमदार कोरे म्हणाले, गतवेळी अशोकराव मानेंना ऐनवेळी उमेदवारी दिली. काही अडचणीमुळे अनेकांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे निसटता पराभव झाला. पाच वर्षांत अशोकराव माने यांनी ठेवलेला संपर्क आणि वारणा समूहातील पदाधिकाऱ्यांनी काम करण्याचा घेतलेला निर्णय यामुळे अशोकराव माने आमदार होणार हे निश्‍चित. वारणा परिसरातील गावात एक लाख ३० हजार मते असून ९० हजार मतदान होईल. वारणेचा परीसस्पर्श नसलेले घर दाखवा. त्यामुळे ६० हजार मते माने यांना मिळतील. ४० हजारांचे मताधिक्य मिळेल.

निवडणुकीत आवाडे गट, महाडिक गट, यड्रावकर, माने गट जनसुराज्यशक्ती पक्षाला साथ देणार आहेत. अशोकराव माने म्हणाले, विद्यमान आमदारांनी अन्य आमदारांच्या तुलनेत मतदारसंघाचा विकास केला नाही. त्यामुळे हातकणंगले विधानसभा मतदारसंघ अद्यापही मागासलेलाच आहे.