हातकणंगलेच्या हवालदाराला 16 हजारांची लाच घेताना अटक

हातकणंगले पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार रविकांत भैरू शिंदे (वय 50, सध्या रा. पाच तिकटी, हातकणंगले, मूळ रा. फणसवाडी, ता. भुदरगड) यास 16 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.तक्रारदार यांचे कुंभोज येथे किराणा मालाचे दुकान आहे. ते गुटखा विक्री करतात. त्यामुळे हवालदार शिंदे याने तक्रारदार यांना पोलिस ठाण्यात भेटण्यास बोलावून गुटखा विक्रीप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी दरमहा 10 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

त्यानंतर मंगळवारी सायंकाळी तक्रारदार यांना फोन करून हातकणंगले पोलिस ठाण्यात बोलावले. दरमहा 10 हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 4 हजार रुपये दरमहा देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे मागील चार महिन्यांच्या 16 हजारांची मागणी शिंदे याने केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत कार्यालयाकडे तक्रार दिली.

शुक्रवारी हवालदार शिंदेला 16 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबतचा गुन्हा हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक बापू साळुंके, पो.हे. सुनील घोसाळकर, संदीप काशिद, पो.ना. सचिन पाटील आदींनी सहभाग घेतला.