आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन ॲक्शन मोडवर

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता इचलकरंजी महानगरपालिकेच्या आरोग्य व अतिक्रमण विभागाकडून घेतली जात आहे. शहरातील सर्वच मुख्य रस्ते, शिवतीर्थ, अटल बिहारी वाजपेयी चौक, आंबेडकर चौक, शाहू पुतळा, गांधी पुतळा, के. एल. मलाबदे चौक, संभाजी चौक, चांदणी चौक, नदीवेस नाका, कोल्हापूर नाका, सांगली नाका या ठिकाणी असणारे राजकीय पक्षांच्या कमानी, विविध पक्षांचे बॅनर हटवण्यात आलेले आहेत.

तर रस्त्याच्या दुभाजकांमध्ये असणारे लहान फलक त्याचप्रमाणे पथ दिव्यांच्या खांबावर लावलेले विविध पक्षांचे झेंडे अतिक्रमण विभागाकडून हटविण्यात आलेले आहेत. तसेच इचलकरंजी शहर दिवाळी बाजारसाठी मुख्य रस्त्यावर फिल्टर हाऊस, लक्ष्मी मार्केट,शिवतीर्थ ते गांधी पुतळा या ठिकाणी दुकानासमोर मंडप घातलेल्या व्यापाऱ्यांना आज रात्रीपर्यंत सदर मंडप काढून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. व्यापारी तसेच दुकानदार यांची सदर मंडप काढून घेतले नाही तर महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून मंडप काढून घेण्याची कार्यवाही आजपासून करण्यात येणार आहे.