हातकणंगलेच्या जागेवरून महायुतीतच रंगली चुरस! शिंदे शिवसेनेचा….

हातकणंगलेच्या जागेवरून महायुतीतच चुरस रंगली आहे. कोल्हापूर उत्तर, करवीर, राधानगरी-भुदरगड, हातकणंगले, शिरोळ या जिल्ह्यातील पाच मतदारसंघांवर शिवसेना शिंदे गटाने दावा सांगितला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून इचलकरंजीच्या माजी नगराध्यक्षा अलका स्वामी आणि माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची नावे चर्चेत आहेत. याच जागेवर भाजप तसेच जनसुराज्यने दावा सांगितल्याने संघर्ष अटळ आहे. शरद पवार राष्ट्रवादीकडून चंदगडला कोण उमेदवार द्यायचा, याबाबत मुंबईत खलबते सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत कागलमधून समरजित घाटगे आणि इचलकरंजीतून मदन कारंडे यांची नावे येण्याची शक्यता आहे.

हातकणंगलेत उमेदवारीसाठी महायुतीतील ईर्ष्या टोकाला गेली आहे. डॉ. अशोकराव माने यांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी, यासाठी गेले काही वर्षे प्रयत्न सुरू ठेवले आहेत; मात्र जनसुराज्य शक्ती पक्षाने या जागेवर दावा सांगितला असून त्यांनीही डॉ. अशोकराव माने यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून सूचित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता शिंदे शिवसेनेकडून अलका स्वामी व डॉ. सुजित मिणचेकर यांची नावे चर्चेत आल्याने उमेदवारी कोणाला द्यायची, याचा महायुतीतील नेत्यांसमोर पेच आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्ह्यात तीन जागा लढविण्याची शक्यता असून कागल, चंदगड व इचलकरंजीच्या जागेचा त्यामध्ये समावेश आहे.चंदगडमधून डॉ. नंदा बाभूळकर यांच्या नावाची चर्चा आहे; मात्र महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांनी त्यांच्या संभाव्य उमेदवारीविरोधात मेळावा घेऊन बंडखोरीचे हत्यार उपसण्याची तयारी दाखविल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चंदगडमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत खलबते सुरू आहेत.

विशेष म्हणजे, काँग्रेसने या मतदारसंघात उमेदवार उभा करायची तयारी दाखविली आहे. भाजपने दोन जागांवर उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे, तर काँग्रेसचे चर्चेचे गुर्‍हाळ नेहमीप्रमाणे सुरू आहे.