‘सिंघम अगेन’मध्ये सलमान खानची एन्ट्री पक्की; अजय देवगणसोबत दिसणार ‘चुलबुल पांडे’

‘सिंघम अगेन’मध्ये अभिनेता अजय देवगणसह अनेक बॉलीवूड स्टार कलाकार मंडळी पहायला मिळणार आहे. यातच आता बॉलीवूडचा दबंग अर्थात सलमान खान यात पाहायला मिळणार आहे. सलमानचा या चित्रपटात कॅमिओ पक्का झाला आहे.दबंग स्टार सलमान खान या ॲक्शन मूव्हीमध्ये चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसणार आहे.

मागील काही दिवसांपासून सलमान या चित्रपटात दिसणार नसल्याचे वृत्त समोर येत होते. बाबा सिद्दिकी यांची हत्या आणि त्यानंतर बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आलेला सलमान खानच्या सुरक्षेसाठी त्याचा कॅमिओ कॅन्सल करण्यात आला होता. पण, सलमान खाननं शुटिंग पूर्ण केलं असून तो ‘सिंघम अगेन’मध्ये कॅमिओ करताना दिसणार असल्याचं कन्फर्म झाले आहे.

सिंघम अगेनमध्ये सलमान खान चुलबूल पांडे म्हणून एन्ट्री घेणार आहे. आपल्या लाडक्या भाईजानला पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यपने दिग्दर्शित केलेल्या ‘दबंग’मध्ये सलमान खान पहिल्यांदा चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसला होता. ‘दबंग’च्या जबरदस्त यशानंतर सलमान खान ‘दबंग 2’ आणि ‘दबंग 3’ मध्ये चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसला होता.

रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ सुपरकॉप टीममध्ये रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अजय देवगण, करीना कपूरसोबत सलमान खानचा सामील होणे प्रेक्षकांसाठी निश्चितच एक उत्तम ट्रीट असणार आहे. ‘बाजीराव सिंघम’ आणि ‘चुलबुल पांडे’ यांना एकत्र पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत. यंदाच्या दिवाळीला रिलीज होणारा ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया 3’ यांच्यात जोरदार टक्कर होणार आहे. दोन्ही चित्रपट 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.