वाळवा तालुक्यातील चिकुर्डे व डोंगरवाडी फाटा येथे पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या विष्ठेमुळे मोठ्या प्रमाणात माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या माशांच्या उपद्रवामुळे परिसर शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ व जनावरे हैराण झाली आहेत.या त्रासाने शालेय विद्यार्थी आजारी पडत असल्याने मागील महिन्यात परिसरातील शाळेला १५ दिवस सुट्टी देण्यात आली होती.
डोंगरवाडी गावच्या हद्दीमध्ये करंजवडे ते ठाणापुढे रस्त्यालगत पोल्ट्री आहे. या पोल्ट्रीमधील कोंबड्यांच्या विष्ठेमुळे घातक माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पाऊस पडल्यानंतर दमट हवामानामध्ये या माशांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिसरात आनंद गुरुकुल निवासी, तसेच लोकमान्य विद्यानिकेतन हायस्कूल अशा दोन शाळा आहेत. मागील महिन्यात या माशांचा उपद्रव एवढा वाढला होता की निवासी शाळेतील अनेक विद्यार्थी आजारी पडले होते. त्यामुळे शाळेला पंधरा दिवस सुटी द्यावी लागली होती.