अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून ‘घड्याळ’ चिन्हावर जयंतरावांना फाईट देण्याच्या भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या मनसुब्यांना धक्का लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शिवसेना शिंदे गटाने अचानकपणे गौरव नायकवडी यांना मुंबईला पाचारण केले आहे. परिणामी, इस्लामपूर मतदार संघात अचानक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. महायुती गोंधळात आहे.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघात जयंत पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण, याची कोंडी फुटलेली नाही. गेल्या दोन दिवसापुर्वी हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेल्याच्या चर्चा सुरु झाल्या. निशिकांत पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी देण्याचे ठरले. निशिकांत मुंबईत दाखल झाले, मात्र प्रवेश थांबला.
मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करतो, मग ठरवू, असे अजित पवार यांनी निशिकांत पाटील यांना सांगितल्याचे समजते. त्यानंतर चक्रे वेगळ्या दिशेने फिरायला सुरवात झाली. हुतात्मा संकुलाचे नेते गौरव नायकवडी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबईला बोलावून घेतले. जयंत पाटलांच्या विरोधात त्यांना उमेदवारी दिली जाते का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.