कांडीमशीनमध्ये साडीचा पदर अडकून महिलेचा मृत्यू

नदीवेस नाका परिसरातील यंत्रमाग कारखान्यातील कांडीम शीनमध्ये साडीचा पदर अडकून एका महिलेचा मृत्यू झाला. ताराबाई मारुती आंबी (वय ४८, रा. शेळके मळा, इचल.) असे त्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. ऐन दिवाळी सारख्या सणाच्या तोंडावर ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.
येथील श्रीपादनगरमधील अमित अशोक बारटक्के (वय ३६) यांचा नदीवेस नाका परिसरात यंत्रमाग कारखाना आहे.

या कारखान्यात ताराबाई आंबी या कांडीमशिनवर काम करत होत्या. २६ ऑक्टोंबरला सायंकाळी त्या नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानक त्यांच्या साडीचा पदर कांडीमशिनमध्ये अडकुन त्यांच्या गळ्याला फास लागला. त्यांचा आरडाओरडा ऐकून कारखान्यातील कामगारांनी कांडीमशिन बंद केली आणि त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले.

मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी अमित बारटक्के यांच्या वर्दीनुसार गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.