इचलकरंजीतील आयुक्त दिवटे यांच्या बदलीचा आग्रह का?

इचलकरंजीच्या शहरातील जनतेला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे .पाणी प्रश्नावर आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना धारेवर धरत आमदार प्रकाश आवाडे यांनी थेट बडतर्फ करण्याची मागणी केली. वास्तविक शहराचा पाणी प्रश्न एका दिवसात निर्माण झालेला नाही याचे भान आमदारांना आहे की नाही हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या कार्यरत असलेले आणि त्यांचा कालावधी पूर्ण झाला नसताना आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली करून दुसऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी आग्रह का धरला जात आहे ? असा ही सवाल केला जात आहे. महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर दुसरे आयुक्त म्हणून ओमप्रकाश दिवटे यांनी दहा महिन्यापूर्वी कार्यभार स्वीकारला. इचलकरंजी शहराची जाण आणि मूलभूत प्रश्न माहित असलेल्या दिवटे यांनी एक एक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, अचानक त्यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली. एका महिला आयुक्तांनी पदभार स्वीकारलाही परंतु पुन्हा दिवटे यांनी लवादाकडे धाव घेतल्याने त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली. आयुक्त दिवटे यांची अचानक बदली का केली ?

आयुक्तांच्या बदलीचा खेळखंडोबा नको इचलकरंजी शहरात आयुक्त म्हणून येणारे अधिकारी अशा पद्धतीने दुसऱ्या आयुक्तांना हटवून जर आले तर त्यांना शहरामध्ये किती सन्मान मिळणार आणि ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतील काय हाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या दर्जाचे पद असलेल्या आयुक्तांच्या पदासंदर्भात तर असा खेळ खंडोबा होणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया सुशिक्षित वर्गातून व्यक्त होऊ लागले आहे.निवडणुका पाणी प्रश्नावर झाल्या. एक विधानसभेची निवडणूक पाणी प्रश्नावर लढवली गेली असे असताना नुकत्याच आलेल्या आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवून त्यांच्या बडतर्फीची मागणी करणे हे कितपत योग्य आहे.वास्तविक शहरातील पाणी प्रश्न हा एका दिवसात न सुटणार विषय आहे.

कृष्णा जलवाहिनी बदलण्याचे काम अत्यंत वेगात सुरू आहे. दोन अडीच किलोमीटर पाईप टाकण्याचे काम शिल्लक राहिले आहे .पावसाळ्यानंतर तेही पूर्णत्वास येणार आहे. त्यानंतर कृष्णा जलवाहिनीस वारंवार होणारी गळती थांबणार आहे. त्याचबरोबर सुळकुड प्रश्नही मार्गी लागणार आहे. सध्या शहराला एक दिवस आड अथवा दोन दिवस आड पाणी मिळत आहे. पाण्याची घडी बसत चालली असताना आयुक्तांची बदली करून काय साध्य होणार आहे ? हा ही प्रश्न आहे. इतके रान फक्त पाणी प्रश्नावर उठवण्यामागे ते एकच कारण आहे की आणखी काही कारण आहे अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे. एकूणच आयुक्तांची बदली आणि त्यासाठी होत असलेले प्रयत्न शहरात चर्चेचा विषय बनला आहे.