सांगोला तालुक्यात प्रथमच राजकारणाला वेगळे वळण

सांगोला तालुक्यात महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष व महायुतीने शिवसेना पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीतील दोन उमेदवारीमुळे बिघाडीची चिन्हे निर्माण झाली आहेत.शेकापच्या देशमुखांसह दोन्ही शिवसेनेच्या तालुक्यातील दोन प्रमुख पाटलांनी शड्डू ठोकल्यामुळे तालुक्यातील राजकारणात यंदा तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सांगोला तालुक्यात प्रथमच राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. आजपर्यंत तालुक्यातील माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी कधी शेकाप पक्षाला तर कधी शेकाप विरोधी उमेदवाराला पाठिंबा दिला.

या विधानसभा निवडणुकीमुळे प्रथमच माजी आमदार साळुंखे पाटील यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष (अजित पवार गट) पदाचा राजीनामा देत थेट शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळवून त्यांनी शेकाप व शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांना धक्का दिला.२०१९ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून स्वतःचा अर्ज असतानाही साळुंखे-पाटीलांनी आमदार शहाजी पाटलांना पाठिंबा दिला होता. सध्या तालुक्यातील प्रमुख तिन्ही पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन व मतदारापर्यंत पोचण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला जात आहे.

महायुतीमधून शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान आमदार शहाजी पाटील, शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून माजी आमदार दीपक साळुंखे पाटील व शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. या तिघांमध्येच खरा राजकीय सामना रंगणार आहे. सध्या तरी तीन पक्षाचे हे तिन्ही नेते निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे दिसून येत आहे.