महाराष्ट्रात यंदा महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार सामना रंगण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही गटातील नेते एकमेकांवर तुटून पडले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्यात या दोन्ही गटात पहिल्यांदाच सामना रंगेल. उद्धव सेना आणि शिंदे सेना राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत इतक्या जागांवर आमने-सामने येणार आहे. हे दोन्ही गट निवडणुकीत त्यांची ताकद दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. कोणत्या सेनाचा वाघ फोडणार डरकाळी?
शिवसेनेच्या दोन्ही गटात 49 जागांवर चुरस दिसेल. यामधील 19 जागा या मुंबई आणि परिसरातील आहेत. तर मुंबई शहरातील 12 जागांवर अटीतटीची लढत दिसेल. याशिवाय मराठवाड्यात आणि कोकणता 8 जागांवर मशाल आणि धनुष्य-बाण चिन्हात सामना दिसेल. तर पश्चिम महाराष्ट्रातील चार जागांवर मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. जून 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षातील अनेक जण एनडीएचा, पर्यायाने महायुतीचा भाग झाले.
राजकीय विश्लेषकांच्या मते, विधानसभा निवडणूक उद्धव सेना आणि शिंदे सेनेसाठी लिटमस टेस्ट असेल. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगत आहेत. तर एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा सांगत आहेत. काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याचा आरोप शिंदे सेना करत आहे. आपण कधीच काँग्रेससोबत जाणार नसल्याचे शिंदे सेनेचे म्हणणे आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासमोर एक मोठे आव्हान आहे. महायुतीचे सरकार आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे, असं नाही तर आपल्या पक्षाचा जनाधार वाढवणे हे पण मोठे चॅलेंज त्यांच्यासमोर आहे. त्यांना 40 हून अधिक जागा मिळवायच्या आहेत. एनडीएमध्ये सहभागी होताना त्यांच्याकडे इतकेच आमदार होते. लोकसभा निवडणुकीत दोन्ही सेना 13 जागांवर एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या. त्यामध्ये उद्धव गटाने 7 जागांवर तर शिंदे सेनेने 6 जागांवर विजय पक्का केला होता.