महाविकास आघाडीतून २५३ सांगोला विधानसभेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आली आहे. वरिष्ठ पातळीवरून शरदचंद्र पवार, उद्धवसाहेब ठाकरे, संजय राऊत आणि नाना पटोले यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन २५३ सांगोला विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील हे असतील असे जाहीर केले आहे.
महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु, महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी जाणीवपूर्वक आपण महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचे भासवून प्रचाराच्या सर्व साहित्यावर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरून मतदारांची दिशाभूल केली आहे. मतदारांची दिशाभूल करणाऱ्या डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यावर निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी.
भारतीय दंड संहिता व भारत निवडणूक आयोग यांचे सूचनांचा भंग केल्यामुळे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख अरविंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. धनंजय पवार तालुकाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख तुषार इंगळे यांनी लेखी निवेदनाद्वारे निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
परंतु, महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी जाणीवपूर्वक सांगोला मतदारसंघात आपण महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचे भासवून सांगोला विधानसभा मतदारसंघातील मतदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचाराच्या सर्व साहित्यावर जाणीवपूर्वक महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
वास्तविक पाहतात डॉ. बाबासाहेब देशमुख आणि महाविकास आघाडीचा काडीचाही संबंध नाही. आम्ही महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. असेही या निवेदनाद्वारे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.