इस्लामपूर – शिराळा मतदारसंघांत महाआघाडी आणि महायुतीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार

इस्लामपूर- शिराळा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप उभे ठाकली आहे. त्यामुळेच आता प्रचारालाही रंगत येणार आहे. उमेदवारांनी प्रचाराचे नारळही फोडले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सांगली – पेठ रस्ता, पाणंद रस्ते, औद्योगिक वसाहती, बेकारी, पाणीपुरवठा योजना, मतदारसंघातील झालेली विकासकामे आदी मुद्दे कळीचे ठरणार आहेत.

वारणा-कृष्णा खोऱ्यात वसलेल्या इस्लामपूर मतदारसंघात ऊस उत्पादक मतदारांची संख्या मोठी आहे. याच ताकदीवर शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, रघुनाथ पाटील, आमदार सदाभाऊ खोत, बी. जी. पाटील आदी नेत्यांची मते निर्णायक आहेत.इस्लामपूर – शिराळा मतदारसंघांत यांच्याही भूमिकांना महत्त्व आले आहे. विद्यमान आमदार जयंत पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक यांच्या सहकारी संस्थांचे जाळे आहे.

त्यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली ताकद लावली आहे. त्यामुळेच या दोन्ही मतदारसंघांतील लढती लक्षवेधी ठरणार आहेत. जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एन्ट्री करून सांगली-पेठ रस्ता, पाणीपुरवठा योजना, इस्लामपूरची बारामती आणि भावी मुख्यमंत्री आदी कळीचे मुद्दे उपस्थित केले.