आटपाडीत मुख्यमंत्री यांची सभा घेणार ; सुहास बाबर

भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे विश्वासू सहकारी माजी पंचायत समिती उपसभापती तानाजी यमगर व भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी यांनी महायुतीच्या शिंदेसेनेचे उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा देत सुहास बाबर व तानाजी पाटील यांच्या विचाराने काम करणार असल्याचे सांगत शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी सुहास बाबर यांच्या विजयासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन प्रभाकर पुजारी यांनी व्यक्त केले.  यावेळी महायुतीच्या शिंदेसेनेचे उमेदवार सुहास बाबर म्हणाले, आटपाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती तानाजी यमगर, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी यांनी शिंदेसेनेत प्रवेश करत सुहास बाबर यांना जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. खानापूर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रेमाने मला लढण्यास मोठे बळ मिळाले असून, अनिलभाऊ नसताना जनता माझ्या पाठीशी उभी आहे. भाऊंनी विकासकामाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली आहे. त्यामुळे आज आम्ही सन्मानाने मते मागण्यास जनतेच्या दरबारात जात आहोत. प्रभाकर पुजारी म्हणाले, आम्ही कोणाशी गद्दारी केली नाही. कुणी कुरघोड्या केल्या तर मग आम्हाला सहन होत नाही.

आमच्या प्रवेशाने कोणाला वाईट वाटले असेल तर त्यांची माफी मागतो व येणाऱ्यांचे स्वागत करतो, अशी भूमिका मांडली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील म्हणाले, विरोधकांना पाणी हे चेष्टेचा विषय वाटू लागला आहे. मात्र, आटपाडी तालुक्यातील जनतेला पाणी जीवन मरणाचा विषय आहे. पाण्याने मतदारसंघाकडे बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.

एमआयडीसीला तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. लवकरच तो प्रश्न मार्गी लावला जाईल. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सुहास बाबर म्हणाले, विधानसभा मतदारसंघातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मतदारांचा आता निर्णय झाला आहे. आपला विजय निश्चित असला तरी यापुढे तुम्ही गाफील राहू नका, असे आवाहन सुहास बाबर यांनी कार्यकर्त्यांना केले. लवकरच आटपाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.