टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सहाव्या टप्प्याला स्व. अनिल बाबर यांचे नाव देऊन शासनानेच अनिल बाबर यांच्या टेंभू योजने बद्दलच्या योगदानावर शिक्कामोर्तब केले आहे, त्यामुळे विरोधकांच्या श्रेय वादाच्या टीकेला कोणताच अर्थ नाही, असे परखड मत शिवसेना नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ विटा येथे महिला मेळावा झाला.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर, शितल बाबर, सोनिया बाबर, यांच्यासह महिला उपस्थित होत्या. बाबर यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतीच्या पाण्यासाठी व्यतीत केले. टेंभू योजनेची पूर्तता आणि सहाव्या टप्प्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. लोकसभेला एखादी जागा कमी आली तरी आमच्यावर टीका झाली. तुमच्याकडे मोठी प्रॉपर्टी, नाव, पैसा सगळी यंत्रणा होती.
त्याच जोरावर आम्हाला संपवून टाकण्याची भाषा केली. हे तुमचे कुठले राजकारण होते. असा अप्रत्यक्ष सवाल गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. सुहास बाबर यांनी खानापूर मतदारसंघात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगलं काम केले आहे. सुहास बाबर म्हणाले, महिलांच्या त्यागामुळेच कुटुंब उभा राहत असते.
माझ्या आईने देखील आयुष्यभर त्याग केला, म्हणूनच आमचं कुटुंब चांगल्या पद्धतीने उभा राहू शकले. स्व. अनिल बाबर यांनी १९९४ ते २०२४ पर्यंत टेंभूच्या पाण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे मतदारसंघाचा कायापालट झाला. आगामी काळात देखील शेतीच्या पाण्याबरोबरच उद्योग, व्यवसाय वाढीसाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत.