आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काहीच दिवस शिल्लक राहिल्या कारणाने मतदारसंघांमध्ये नेते मंडळींची लगबग सुरू झालेली आहे. प्रचार दौरे, सभा, गाठीभेटी यावर जोर दिला जात आहे. इस्लामपूर विधानसभेच्या इतिहासात अपवादाने विरोधकांचे मनोमिलन होताना दिसत आहे.
सर्व पक्ष एकत्र येत राष्ट्रवादीतून निवडणूक लढवत असलेल्या निशिकांत पाटील यांना एकमुखी पाठबळ देत हम सब आपके साथ है चा सर्वांनी नारा लगावला आहे. गेल्या 35 वर्षात आजपर्यंतच्या इतिहासात माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व मिळवले आणि आपला बालेकिल्ला असलेल्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघावर दबदबा कायम राखला आहे.
जयंती पाटील यांनी नेहमीच मतदारसंघात आपला विरोधक संपवण्याचे काम केले. बेरजेचे राजकारण करत त्यांनी विरोधकांना कधीही कायमचे विरोधक राहू दिले नाही. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात वरिष्ठ पातळीवर झालेला निर्णय आज जयंत पाटील यांना शह देण्यासाठी पारंपारिक विरोधकांच्या एकजुटीची मोठ बांधण्यात यश आले असून त्या एकजुटीने निशिकांत पाटील यांच्या प्रचार सभांचा धुरळा सुरू आहे.
या एकास एक लढतीच्या, एकजुटीच्या वातावरणाने इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांच्या विरोधात अटीतटीची लढत होण्याचे चित्र सध्या निर्माण झालेले आहे. गेली 35 वर्षे अभेद्य असलेला बालेकिल्ला काबीज करून जयंत पाटील यांना शह देण्यात विरोधकांना खरंच यश मिळणार का? हे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतरच ठरणार आहे.