आगामी विधानसभा निवडणुकीचे मतदान हे बुधवारी 20 नोव्हेंबरला होणार आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी एकच दिवस शिल्लक राहिल्या कारणाने प्रत्येक मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार दौरे, सभा मेळावे होत आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होत असून प्रचारात महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा आवळे यांनी निर्णायक आघाडी घेतलेली आहे.
मतदारसंघांमध्ये केलेली विकास कामे, आक्रमक प्रचार यंत्रणा आणि शेवटच्या चार दिवसांचे परफेक्ट नियोजन यामुळे आमदार राजूबाबा आवळे यांनी निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे महायुतीतील जनसुराज्य शक्ती पक्षातील अंतर्गत गटबाजी, प्रमुख नेत्यांनी केलेला कानाडोळा आणि वयाच्या मुद्द्यामुळे अशोकराव माने प्रचारात चाचपडत आहेत. तिसऱ्या महापरिवर्तन आघाडीचे उमेदवार सुजित मिणचेकर यांचा विशिष्ट समाजांना केंद्रस्थानी ठरवून सुरू असलेला प्रचार त्यांच्यासाठी अडथळा ठरत आहे.
परंतु विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांनी तीन महिने आधीपासूनच आपल्या प्रचाराचे नियोजन केले. तसेच त्यांना सतेज पाटील यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळत आहे. तसेच सर्व समाजातील केलेली विकासकामे व सर्व समाजामध्ये असलेला त्यांचा संपर्क त्यांच्यासाठी खूपच फायद्याचा ठरत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पाटील यांची यंत्रणा व आवळे गट जोमात काम करत असून त्यांना निष्ठावंत शिवसैनिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे चांगले पाठबळ मिळत आहे. त्यामुळे सध्या हातकणंगले मतदारसंघांमध्ये राजूबाबा आवळे यांचीच हवा दिसत आहे.
