शेकाप पक्षाचा अनेक दशके बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा शेकाप पक्षाने झेंडा फडकवला आहे. शिवसेना व महायुतीचे मातब्बर उमेदवार विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांचा शेकाप उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी तब्बल 25 हजार 386 मतांनी दणदणीत पराभव केला. विधानसभा मतदारसंघात दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी शहरासह तालुक्यातील अनेक गावा चुरशीचे मतदान पार पडले होते. तर दिनांक 23 नोव्हेंबर रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी सभागृहात मतमोजणी पार पडली.
तब्बल 11 वेळा सांगोला मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणारे स्व. भाई गणपतराव देशमुख यांचे डॉ. बाबासाहेब देशमुख हे नातू असून, आजोबांनी केलेली पुण्याई नातवाला आमदार करण्याच्या कामी आली अशी चर्चा आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील, शिवसेना उबाटाचे दीपकआबा साळुंखे पाटील व शेकापचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यात काटे की टक्कर होती यामध्ये नवखे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी बाजी मारली.