शेतकरी कामगार पक्षाने सांगोला हा बालेकिल्ला पुन्हा एकदा ताब्यात घेतला आहे. संपूर्ण राज्यात शेकापने एकमेव जागा जिंकलेल्या सांगोल्यात या पक्षाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आपले आजोबा दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा चालवत महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहण्याचे ठरविले आहे.आपल्या विजयामागे ‘अदृश्य शक्ती’ चा हात असल्याचा त्यांनी केलेल्या दावा दुसऱ्या बाजूला चर्चेचा विषय ठरला आहे. सांगोला मतदार संघात डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मावळते आमदार शहाजीबापू पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे दीपक साळुंखे या दोघांचा पराभव करून विजय मिळविला आहे.
यात शिवसेनेतील मत विभागणीचा लाभ शेकापने घेतल्याचे दिसून येते.सांगोल्याचे नवनिर्वाचित आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी महायुतीच्या समर्थनाचा विचार सोडून देऊन महाविकास आघाडीच्या पाठीशी राहण्याचा मनोदय बोलून दाखविला आहे. आपले आजोबा गणपतराव देशमुख यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याची आणि जातीयवादी शक्तींपासून दूर राहण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
महाविकास आघाडीने शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांना डावलून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सांगोल्याची जागा लढविण्यासाठी दिली होती. त्यामुळे महाविकास आघाडीची साथ मिळाली नाही. आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सभाही मिळाल्या नाहीत. मात्र तरीही दिवंगत नेते गणपतराव देशमुख आणि शेकाप बरोबर मागील तीन-चार पिढ्यांपासून प्रेम करणाऱ्या मतदारांनी साथ दिली.
गणपतराव देशमुख यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आपण सोडणार नाही, असे नवनिर्वाचित आमदार डॉ. देशमुख यांनी सांगितले. या निवडणुकीत एकीकडे गावागावातून मतदारांची साथ मिळत असताना दुसरीकडे काही ‘अदृश्य शक्तीं’नीही मदत केली, याचाही उल्लेख डॉ. देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे ही अदृश्य शक्ती नेमकी कोण, याबाबत कुतूहल निर्माण झाले असून त्याची चर्चा रंगली आहे.
