विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी म्हणजे 23 नोव्हेंबरला लागला आणि या विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वत्र महायुतीला मताधिक्य मिळालेले आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात राहुल आवाडे यांना यश मिळाले आणि ते निवडून आले. विजयानंतर राहुल आवाडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसह अनेक विविध योजना राबवलेल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात तसेच राज्यात सर्वत्रच महायुतीला मताधिक्य मिळालेले आहे आणि आपल्या या विजयामध्ये महायुतीचे सर्व स्थानिक पदाधिकारी, आम. प्रकाश आवाडे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांचे मोठे योगदान लाभलेले आहे. जनतेने आपल्यावर विश्वास दाखवल्याने सर्व मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक करणार तसेच प्राधान्याने इचलकरंजी शहरातील जो पाणी प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न, उद्योग व्यवसायाचा प्रश्न, पंचगंगा प्रदूषण मुक्ती, नर्सिग तसेच मेडिकल कॉलेज सुरू करणे, व्यवसाय वृद्धी, महिला सुरक्षेवर उपाययोजना करून त्यांना स्वावलंबी बनवणे अशा सर्व सर्वांगीण विकासात्मक कामांच्या पूर्ततेसाठी आपण कायमच प्रयत्नशील राहणार असल्याचे राहुल आवाडे यांनी सांगितले.
