महाराष्ट्रात महायुतीची निर्विवाद सत्ता आली असून मुख्यमंत्रीपद भाजपकडं जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नवे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचं नाव त्यांचे समर्थक पुढं करत असले तरी हायकमांडच्या मनात वेगळंच सुरू असल्याची शंका आहे.या पदासाठी इतर नावांचाही विचार सुरू असल्याचं समजतं. तसं झाल्यास फडणवीसांना दुसऱ्यांदा धक्का बसणार आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३० जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं सत्ता कुणाची हे स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यामुळं नवा मुख्यमंत्री कोण होणार याविषयी उत्सुकता आहे. शिंदे व अजित पवार यांच्या पक्षानं हा निर्णय भाजप नेतृत्वावर सोपवला आहे. भाजप नेतृत्व जे नाव निश्चित करेल ते आम्हाला मान्य असेल, असं दोन्ही पक्षांनी स्पष्ट केलं आहे.
भाजपमध्ये पुन्हा एकदा फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, अद्यापही भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड झालेली नाही. त्यामुळं वेगळी चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडून मराठा किंवा ओबीसी नेत्याला मुख्यमंत्रिपद दिलं जाण्याची दाट शक्यता आहे.याच वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रचंड गाजला होता. लोकसभेला मराठा समाजाच्या नाराजीचा फटका भाजपला बसला.
मात्र, विधानसभेला मराठा समाजानंही महायुतीला मतदान केल्याचं दिसून आलं. तसंच, भाजपचा परंपरागत ओबीसी मतदारही सोबत राहिला. त्यामुळं सत्ता आल्यानंतर आता त्याच वर्गातील एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्रिपद देण्याचा विचार सुरू असल्याचं सूत्रांकडून समजतं.