इस्लामपुरात आगामी निवडणुका चुरशीने होण्याचे संकेत

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील सलग आठवा विजय नोंदविताना आ. जयंत पाटील यांची चांगलीच दमछाक झाली. अनेक गावात निशिकांत पाटील यांना चांगले मताधिक्य मिळाले. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत आपले मताधिक्य वाढते ठेवण्याच्या परंपरेला दुसऱ्यांदा लढणाऱ्या निशिकांत भोसले-पाटील यांनी ‘ब्रेक’ लावल्याचे स्पष्ट झाले. यावेळी पहिल्यांदाच निशिकांत पाटील यांनी २१ पैकी ५ फेऱ्यांमध्ये जयंत पाटील यांच्यावर आघाडी घेण्याची किमया करून दाखवली.

इस्लामपूर मतदारसंघातील ५७ पैकी २० गावांमध्ये निशिकांत पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांच्यापेक्षा मतांची आघाडी घेतल्याचे मतमोजणीनंतरच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जयंत पाटील यांना इस्लामपूर शहरातून सर्वाधिक ७ हजार २०३ इतके मताधिक्य मिळाले आहे. 

इस्लामपूर मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका चुरशीने होण्याचे संकेत आहेत. यापुढील काळात मतदारसंघातील राजकीय वातावरण तापलेले राहणार आहे.