देवगड तालुक्यातील कुणकेश्वर-वरचीवाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी आपल्या आंबा बागायतीतील हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी मार्केटला पाठविल्या असून देवगड हापूसच्या एक डझनच्या एका पेटीला 2500 रु.इतका दर मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
हवामानात वारंवार होणार्या बदलामुळे चांगल्या पद्धतीने आंबा पीक घेणे आज शेतकर्यांना कठीण बनले आहे. कारण उत्पादनापेक्षा कीटकनाशकांच्या औषध फवारणीसाठी खर्च केला जातो आणि यामध्येच हापूस आंबा पीक घेणे व ते टिकवणे हे खूप कठीण बनत चालले आहे. अशातच देवगड तालुक्यातील कुणकेश्वर-वरचीवाडी येथील नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी आपल्या बागेतील हापूस आंब्याच्या कलमांना श्रावण महिन्यापासून मोहोर येऊ लागला होता. हवामानाच्या बदलामुळे हा मोहोर गळून देखील बर्याचवेळा पडला. मात्र आलेला मोहोर टिकवण्यासाठी या दोन बंधूंची धडपड होती, यात त्यांना यशही आले. त्यांनी आपल्या बागेतील मोहोर टिकावा यासाठी नियोजनपूर्वक कीटकनाशकांची फवारणी करत आंबा पीक जपण्याचा प्रयत्न केला.
यावर्षीच्या देवगड हापूसच्या हंगामातील देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी नोव्हेंबर महिन्यातच पाठविण्याचा मान कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार धुरी यांना मिळाला आहे. यावर्षी त्यांनी एक एक डझनच्या देवगड हापूसच्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी यांच्या पेढीवर पाठविल्या असून यातील एका डझनच्या पेटीला 2500 असे दोन हापूसच्या पेटींना पाच हजार रुपये दर मिळाला असल्याचे धुरी यांनी सांगितले. दोन महिने अगोदरच देवगड हापूस दाखल झाल्यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजारपेठेत देवगड हापूसची मागणी वाढलेली दिसत आहे.