खानापुर तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून सुगीचा हंगाम सुरू आहे. यातच हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला असून दिवसाढवळ्या हत्ती शेतात धुमाकूळ घालत आहेत. नायकोल येथे मळणी सुरू असताना नऊ हत्तींचा कळप शिवारात दाखल झाल्याने शेतकऱ्यांना पळता भुई थोडी झाली. शेतकऱ्यांनी मळणीचे साहित्य टाकून जीव वाचवण्यासाठी मळणी सोडून पलायन केले. हत्तींच्या कळपाने मळणीचे भात तसेच रचून ठेवलेल्या भाताच्या वळी विस्कटून भाताचे नुकसान केले आहे. जवळपास १२५ पोती भाताचे नुकसान झाले आहे. नायकोल येथील कृष्णा मनोळकर, श्याम पाटील, भाऊ गावडा, मोना गावडा यासह इतर शेतकऱ्यांच्या भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सध्या सुगीचा हंगाम सुरू असून शेतकरी भातमळणी करून घरी आणण्याच्या लगबगीत आहेत. गेल्या दोन दिवसापासून पुन्हा हवामानात बदल झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कापलेले भात मळणी करून घरी आणण्याच्या लगबगीत शेतकरी लागला असताना गेल्या पंधरा दिवसांपासून हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. हातातोंडाशी आलेले भातपीक हत्तींच्या कळपाने धुमाकूळ हवालदिल घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकरी भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. वन्यप्राण्यांकडून होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे, वनखात्याने हत्तींचा तसेच इतर जंगली जनावरांचा योग्य बंदोबस्त करावा, अशी मागणी होत असताना देखील वनखात्याकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.