सांगली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम यंत्रावर संशय व्यक्त करत काँग्रेस ने सांगली दहा आणि जत विधानसभा मतदारसंघातील दोन बूथच्या पडताळणीची मागणी केली आहे. त्यासाठी सांगलीचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील, जत मधून उमेदवार विक्रमसिंग सावंत यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल केला आहे. मत पडताळणीसाठी पाच लाख ६६ हजार ४०० रुपये जमा केले आहेत. विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर महाविकास आघाडीतील बहुतांशी वरिष्ठ नेत्याने ईव्हीएम यंत्रावर संशय व्यक्त केला आहे. उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात मत पडताळणीची मागणी करावी अशी सूचना त्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सांगली आणि जत मतदार संघासाठी पराभूत उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.
निवडणूक विभागाच्या नियमानुसार एका बुथचे मत पडताळणीसाठी ४७ हजार रुपये शुल्क भरावा लागतो. जत मध्ये विक्रमसिंह सावंत यांनी दोन बूथच्या पडताळणीची मागणी करून ९४ हजार ४०० रुपये भरले आहेत. सांगलीत पृथ्वीराज पाटील यांनी दहा बूथच्या पडताळणीची मागणी करत चार लाख बहात्तर हजार रुपये भरले आहेत. नियमानुसार या दोन्ही उमेदवारांनी कोणत्या बूथबाबत शंका आहेत. त्या यंत्राचे क्रमांक ही सादर केले आहेत. त्यासाठी एक तज्ञ प्रतिनिधी सुचवण्यात आला आहे. ही प्रक्रिया कधीपर्यंत पार पाडली जाईल याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. निवडणूक आयोगाच्या धोरणानुसार एकूण मतदार यंत्राच्या पाच टक्के यंत्र व चिट्ट्यांची पडताळणी केली जाऊ शकते. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवार त्याची मागणी करू शकतात. सांगली विधानसभा मतदारसंघातील बूथ नंबर १५, २०, ७२, ९७, १३८, १९०, २४२, २७७, २९४, ३१३, आणि जत विधानसभा मतदारसंघातील दरीबडची येथील बूथ नंबर २२०, २२१, केंद्रावरील भूतच्या पडताळणीची मागणी काँग्रेसने केली आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून पडताळणी होणार आहे.