विटा शहरात पार्किंगचा बट्ट्याबोळ; पालिका प्रशासनाची उदासीनता

विटा शहराच्या वाढत्या विस्तारासह शहरातील दुचाकी, चारचाकी पार्किंग व्यवस्था पुरेशी नाही. शहरातून विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग व सांगली-भिगवण राज्यमार्ग गेला आहे. या रस्त्यावरून दुचाकीसह अवजड वाहनांची मोठी रहदारी असते. शहरातील मायणी, कऱ्हाड व खानापूर रस्त्यावर सायंकाळी सहानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहने लावण्यासाठी पुरेशी जागा व अरुंद रस्ते असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे.

शिवाय रस्त्यालगत असणाऱ्या सर्रास दुकानदारांनी त्यांच्या दुकानांची जाहिरात करण्यासाठी पार्किंग पट्ट्यात लोखंडी फलक उभारले आहेत. तसेच दुकानापुढे वाहनधारकांनी दुचाकी दुकानापुढे लावू नयेत, यासाठी लोखंडी जाळ्या व लोखंडी खांब टाकले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना पार्किंग असूनही त्याठिकाणी दुचाकी लावता येत नाहीत, अशी स्थिती आहे.

मायणी रस्त्यालगत भेळ व चायनीज असे पन्नासच्या आसपास हातगाडे आहेत. तेही रस्त्यावर उभा केले आहेत. रस्ता मोठा असूनही वाहतूक व पार्किंगसाठी या हातगाड्यांचा अडथळा ठरत आहे. याकडे पालिकेच्या अतिक्रमण निमूर्लन विभागाच्या अधिकाऱ्यांचे सोयीस्करपणे दुर्लक्ष आहे. एखाद्याने तक्रार केली तर ‘बघतो, करतो,’ असे नेहमीचेच उत्तर हे अधिकारी देत आहेत. शहरात ठिकठिकाणी पार्किंगचे पांढरे पट्टे नाहीत.

पार्किंग फलकांची दुरवस्था व जीर्ण झाले आहेत.खानापूर रस्त्यांचीही तीच अवस्था आहे. पालिकेवर प्रशासक म्हणून प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल काम पाहत आहेत. डॉ. बांदल यांनी पार्किंगची जटिल समस्या सोडवावी, अशी अपेक्षा नागरिक, वाहनधारकांची आहे. विटा येथे दुचाकी, चारचाकी पार्किंगचा प्रश्न जटिल बनत चालला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. पालिकेचा वर्षानुवर्षे पार्किंग आराखडा कागदावर आहे. त्याची प्रत्यक्षात अद्यापही कृती झाली नाही.

पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहरातील पार्किंगचे भिजत घोंगडे पडले आहे. येथे मायणी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे भेळ व चायनीजचे हातगाडे हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिक व वाहनधारकांतून होत आहे.