दोन कुटुंबांतील वादामुळे महाराणा प्रताप चौकात जमावाकडून परस्परांवर दगडफेक झाली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये दोन महिला जखमी झाल्या. लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन जमावाला पांगवले. मात्र, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात रात्रभर तणावाचे वातावरण होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराणा प्रताप चौकातील दोन गटांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद आहे. या वादातून या परिसरात नेहमीच तणावाचे वातावरण असते. किरकोळ कारणावरून शनिवारपासून या गटांतील वाद धुमसत होता. रविवारी रात्री या दोनही गटांतील वाद उफाळून आला. ११ वाजण्याच्या सुमारास दोन्ही गट आमने-सामने आले. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगड आणि विटा फेकून मारल्या. सुमारे अर्धा तास हा प्रकार सुरू होता. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोनही गटाच्या कार्यकर्त्यांना पंगविण्यात आले. यानंतरही अर्धा तास दोनही गट सामोरासमोर थांबून होते. अखेरीस पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी किरकोळ लाठीचार्ज केला. दरम्यान, या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.