केंद्र व राज्य सरकारकडून दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंबाला सरकारी स्वस्त धान्य दुकानातून नि:शुल्क धान्याचे वाटप केले जाते. सांगोला तालुक्यातील 155 स्वस्त धान्य मार्फत 42 हजार 665 कार्डधारक आहेत. यामध्ये पात्र लाभार्थ्यांना स्वस्त धान्य उरले जात आहे. त्यासाठी संबंधित दुकानाला सरकारकडून महिन्याच्या सुरुवातीलाच आवश्यक राखीव धान्याचा पुरवठा केला जातो. डिसेंबरमध्येही हा पुरवठा वेळेवर झाला.
परंतु, ९ डिसेंबरपर्यंत पुरवठा झालेल्या धान्याची नोंद ‘ई-पाॅस’ यंत्रात झाली नाही. त्यामुळे दुकानदारांना बायोमेट्रिक घेऊन धान्य देता येत नव्हते. हा तांत्रिक घोळ १० डिसेंबरला सकाळी दुरुस्त झाला. परंतु, आता सर्व्हर डाऊन असल्याने एका ग्राहकाला धान्य देण्यासाठी ‘ई-पाॅस’ यंत्रावर लागणारा कालावधी एक ते दीड मिनिटांवरून १५ मिनिटांवर गेला आहे. त्यामुळे तासनतास रांगेत उभे राहूनही ग्राहकांना धान्य उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
‘ई-पाॅस’ यंत्रावर धान्याचा साठा विलंबाने दर्शवण्यात येत होता. अखेर ती अडचण दूर झाली असून १० डिसेंबरपासून धान्याचा पुरवठा सुरू झाला. परंतु, आता सर्व्हरची समस्या उद्भवत धान्य वाटायला वेळ जास्त लागत आहेत.
